व. पु. काळे 
Wisdom मराठी

व. पु. काळे यांच्या लेखणीतून उलगडणारे विचार हे फक्त शब्द नसून जीवनाचा गाभा समजून घेण्यासाठीचा मार्गदर्शक ठरतात. त्यांचे विचार आपल्याला नेहमीच एक नवी दिशा आणि प्रेरणा देतात. त्यांच्या लिखाणात मानवी स्वभाव, जीवनाच्या समस्या, प्रेमाचे स्वरूप, आणि असंख्य तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. मित्रानो व.पु. काळे यांच्या लेखणीतील निवडक प्रेरणादायी विचार आज इथे पाहुयात जे त्यांच्या काळातही मार्गदर्शक आणि वास्तविक होते, आजही आहेत, आणि भविष्यातही राहतील.
व्यवहारी माणसांचे स्वभाव आणि प्रेमाचे खरे स्वरूप
‘व्यवहारी माणसांत, समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?’
अर्थहीन श्रद्धा आणि अस्थिरता
अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच. जित्याजागत्या माणसांशी संवाद संपला की हे तकलादू आधार शोधावे लागतात.
समस्यांशी मुकाबला करण्याची तातडीची आणि शाश्वत साधने
माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलं आहे? आशा-निराशा, साफल्य-वैफल्य, सुख-दुःख, मिलन-विरह, हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात. कातडीवर तीळ असला काय आणि नसला काय? काय अडतं? ही माणसं अशीच. ह्यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटाटोप नको. सुगंध हवा, पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको. मुलं हवीत, पण संगोपनाची यातायात नको.
आयुष्याचा ग्रंथ: स्वतःसोबत असलेला प्रचंड दस्तऐवज
एकूण एक ग्रंथांना मागे सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येक जण स्वतःबरोबर आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती हे न सांगणारा ग्रंथ. ह्या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला असतो. श्वासाश्वासागणिक एकेक शब्द इथं छापला जातो. इथे प्रत्येक शब्द हा फक्त प्रूफच. प्रूफरीडिंग नाही. खोडरबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव ग्रंथ. ‘चुकीची दुरुस्ती’ किंवा ‘शुद्धिपत्रक’ कोणत्या पानावर टाकायचं, ते ग्रंथकर्त्यालाच माहीत नसतं. अनेक चुका जगजाहीर होतात. अनेक लादल्या जातात. असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना ह्या एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे की, ज्यातली असंख्य पानं कुणालाही वाचता येत नाहीत. अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो. श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो. जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो. क्वचित केव्हा केव्हा आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहिला नाही?‘– अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर दिसते. इन्कमटॅक्स ऑफिसरसमोर बँकेची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात. तशी काही प्रांजळ माणसं, सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात. शुभलाभ आणि स्वस्तिक काढून दोन दोन चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे. त्यांनी तर देशाच्या ग्रंथातली पुढची पानंसुद्धा, सत्ताधाऱ्यांना खळ लावून, बरबटून टाकली आहेत. पण जिथे संवाद जुळतो तिथे तुमचं आमचं, म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं पुस्तक वेगवेगळं राहत नाही. एकाच आवृत्तीतली एक प्रत, उरलेल्या प्रतींशी बोलत राहते.
परमेश्वराची अचूक योजणा
परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जिवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो. तोल बिघडतो. त्याची रचना पाहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो. कंजूष नवऱ्याला उधळी बायको देतो. ‘भगवंता, कसली जोडीदारीण देतोस?’– म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही. मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो– आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो. आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताच जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते.
जीवनाचा गाभा: वरवरचं आयुष्य आणि त्यातील दगदग
अनेक समस्या, त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं... अनेक समस्यांचं...
**
व. पु. काळे यांच्या विचारांनी तुमच्या जीवनाला प्रेरणा दिली असेल तर मला सांगा! तुमचं मत आणि प्रतिक्रिया या ब्लॉगमध्ये अधिक सुंदरता आणू शकतील.
No comments:
Post a Comment